” भेट स्वतःची…. “
रात्री चे दहा वाजले होते, अचानक व्हॉट्सअँप कॉल आला,
” अरे काय, किती दिवस आपण भेटलो नाही, आठवत का कधी शेवटचा कॉल केला होता ? “, ग्रुप व्हिडिओ कॉल वर अमुल बोलत होता.
राजेश, ” अरे यार खुद को मिलने का समय नही और आप दोस्तों को मिलने की बात कर रहे हो. सुहास जी से पूछिये ये कब अपने आप से मिले थे.”
खरच हा प्रश्न अंतर्मुख करून गेला. एक एक करत व्हिडिओ कॉल वर जॉईन झाले, ट्रेलर प्रमाणे सगळं डोळ्यासमोरून गेलं, माहीत नाही का या वेळी मी कमीच बोललो कारण राजेश च्या बोलण्याचा विचार कुठेतरी माझ्या अंतर्मनात चालू झाला होता.
खरच , कधी आपण स्वतःला म्हणालो आहे का, अरे काय कुठे आहेस, कस चालू आहे, काही प्रोब्लेम तर नाही ना ?
इतरांसाठी माझ्या तोंडून बाहेर पडणारे हे शब्द मात्र स्वतःसाठी कधी बाहेर पडले होते मलाही आठवत नाही. बहुतेक कोणी स्वतःला असे प्रश्न विचारत च नसेल, मग स्वतःला भेटणं तर दूरच राहिलं.
बरेच महिने झाले असतील ना मला स्वतःला भेटून, थोडाफार वेळ मिळतो तो सुद्धा आजकाल मोबाईल वर जात आहे, कुठे ट्रॅफिक मधून ड्राईव्ह करत जायचं, खरंच मी खूप आळशी झालोय आजकाल.
पूर्वी २-३ महिन्यातून एक वेळा तरी मी कुठेतरी हील स्टेशन किंवा एखाद्या जंगलात जायचो, उंच शिखरावर बसून सभोवताल च जग न्याहाळताना स्वतःशी थोडाफार संवाद होत होता, सहज कोणाची आठवण आली तर मेसेज जायचा आणि नंतर येणाऱ्या कॉल वर एक एक करत सगळे जॉईन व्हायचे.
सूर्यास्त पाहूनच मी घरी निघायचो. पण आजकाल कुठे जाऊन मित्रांशी एकांतात गप्पा मारणं, जुन्या आठवणी ताज्या करणं तर दूरच पण स्वतःला भेटण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत नाहीय. माहीत नाही कधी भेटेल.
जगात स्वतःसोबत वेळ घालवणं हे एक अतिशय सुंदर, समाधानकारक आणि आत्मबोध करणारा अनुभव आहे.
आजच्या जगात, जिथे प्रत्येकजण व्यस्त आहे, तिथे स्वतःला शोधण्यासाठी आणि स्वतःसोबत शांतपणे विचार करण्यासाठी वेळ काढणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं.
इतर लोकांसोबत राहणं, त्यांच्यासोबत संवाद साधणं, यामध्ये अनेक वेळा अपेक्षा निर्माण होतात. त्या अपेक्षांमुळे कधी आपल्याला हवे तसे वागता येत नाही, तर कधी आपणच त्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकतो. आपल्या खऱ्या विचारांना, भावनांना व्यक्त करण्यासाठी जागाच उरत नाही.
अशा वेळी, स्वतःसोबत वेळ घालवणं हे केवळ शारीरिक किंवा मानसिक विश्रांती नसून, तो एक आत्मिक अनुभव ठरतो.
आपण इतर लोकांसोबत वेळ घालवत असताना, त्यांच्या विचारांचे आणि त्यांच्या अपेक्षांचे प्रभाव आपल्या मनावर पडू शकतात. अनेक वेळा काही जण दुसऱ्यांच्या विचारांच्या प्रवाहात वाहून जातात आणि आपली स्वतःची ओळख हरवून बसतो.
अशा परिस्थितीत आपल्याला वाटतं की काही जण इतरांसाठी आपलं अस्तित्व बदलत आहेत. काही वेळा काही जणांच्या निर्णयांमध्ये, विचारांमध्ये आणि वागणुकीत इतरांचा प्रभाव पडतो, ज्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व दिसून येत नाही. अशा वेळी स्वतःसोबत वेळ घालवणं आपल्याला आपल्या मूळ स्वभावाशी जोडून ठेवतं.
व्यावसायिक किंवा सामाजिक गाठीभेटींच्या वेळी आपण बराच वेळ इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकून जातो. या अपेक्षांमुळे आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं आपल्याला जड जातं.
त्याचसोबत, मनोरंजनाच्या नावाखाली आपण निरर्थक गोष्टींमध्ये गुंततो, ज्यामुळे वेळ आणि ऊर्जा वाया जाते. कधी-कधी मनोरंजनाच्या नादात काही जण स्वप्नांच्या दुनियेत हरवतात आणि वास्तविकते पासून दूर जातात.
त्यात जर मतभेद निर्माण झाले, तर काही जणांशी दुरावा वाढतो, आणि कधी-कधी अनपेक्षित अपमानासुद्धा सहन करावा लागतो. हे मतभेद नेहमीच मोठ्या गोष्टींवर नसतात, तर कधी अगदी लहान गोष्टींवरसुद्धा होऊ शकतात. समोरील व्यक्तीने आपल्या मनासारखं च वागावं, ही अपेक्षा कोणत्याही नात्यासाठी घातक असते.
त्या लहान गोष्टी कधी-कधी उंदीर एवढ्या समस्येचं डोंगर करतात आणि नाती तुटताना दिसतात. कारण अहंकार हा छोटा असतो पण तो अविचारीपणाने मोठा होऊन जातो आणि ते नात कितीही जवळच किंवा मैत्रीपूर्ण असलं तरीही संपुष्टात येतं.
म्हणूनच मला वाटतं की जे लोक या मोहांपासून दूर राहतात आणि स्वतःसोबत वेळ घालवतात, ते खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात.
जेव्हा आपण स्वतःसोबत एकांतात वेळ घालवतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनाच्या गाभ्याशी पोहोचता येतं. आपण आपल्या विचारांना स्वातंत्र्य देऊ शकतो, आपल्या भावनांशी प्रामाणिकपणे संवाद साधू शकतो आणि त्या संवादातून आपण अधिक प्रगल्भ आणि संतुलित होतो.
स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजे आपल्या विचारांना दिशा देणं, आपल्या भावनांना योग्य शब्दात व्यक्त करणं, आणि आपल्या मनाच्या गोंधळलेल्या विचारांना एक नवी दिशा देणं. या प्रक्रियेत आपण आपल्या स्वतःच्या शक्तींचा शोध लावतो.
जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा कुणाचं मत आपल्या निर्णयांवर परिणाम करत नाही, कुणाची अपेक्षा आपल्यावर ओझं बनत नाही. आपण फक्त आणि फक्त आपल्या मनाचा विचार करतो, आपल्या अंतर्मनाशी चर्चा करतो.
आपण जगात अनेक लोकांशी नाती निर्माण करतो, संवाद साधतो, पण या नात्यांमध्ये शाश्वती नसते. प्रत्येक नातं कधी ना कधी तुटू शकतं, बदलू शकतं.
पण स्वतःसोबतचं नातं हे कायमच असतं. ते नातं तुटण्याची शक्यता नाही, कारण ते आपल्या आत असतं, आपल्या अंतर्मनात असतं.
हेच नातं आपल्या खऱ्या अस्तित्वाशी जोडलेलं असतं.
या आत्मसंवादातूनच खरा आनंद, समाधान, आणि जीवनाचा अर्थ सापडतो. प्रत्येकजण आपल्या जीवनात स्थिरता आणि समाधान शोधतो, आणि ती स्थिरता इतरांमध्ये नाही, तर स्वतःसोबत असलेल्या वेळेत आहे. इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली काही जण तुटतात, पण स्वतःसोबत असलेलं नातं आपल्याला कायमच उभं करतं.
स्वतःशी चर्चा करणं म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार. यातूनच आपल्या भविष्याची दिशा ठरवली जाते.
म्हणूनच जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे स्वतःची भेट घेणं, स्वतःसोबत वेळ घालवणं… स्वतः चा मित्र होण…..
09.10.2024
