बाबा महाराज सातारकर
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह.
चंद्रभागेच्या या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरमाउलींपासून कळस सजवणाऱ्या संतश्रेष्ट तुकाराम महाराजांपर्यंत सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी रंगली, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली.
आज याच वाळवंटात नाचत, जयघोष करत, हजारो वारकरी फेर धरतात तो हरिभक्तीपरायण श्री बाबामहाराज सातारकरांच्या किर्तनांच्या तालावर.
किर्तनकलेचा परिपुर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान म्हणावे, भागवत धर्माचा वैश्वीक राजदूत म्हणावे, की आधुनिक काळातील माउली महावैष्णव! श्री बाबामहाराज सातारकरांचं कर्तृत्त्व, वक्तृत्त्व, नेतृत्त्व आणि व्यक्तीमत्त्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात.

🙏 श्री बाबामहाराज सातारकर यांची थोडक्यात माहिती : –
पूर्ण नाव – नावनीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
जन्म५ – फेब्रुवारी १९३६
जन्मस्थान – सातारा, महाराष्ट्र, भारत
वडील – ज्ञानेश्वर
आई – लक्ष्मीबाई
पत्नी – रुक्मीणी
अपत्ये – भगवती(१९५८), रासेश्वरी(१९६२), चैतन्य(१९६३)
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला.
बालपणी त्यांना घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती आणि प्रसंगी जुळीतही उठुन दिसते.
सदगुरु दादा महाराज त्यांचे आजोबा आहेत. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती.
२४ मार्च सन १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षणी नात दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकल-सौभाग्य-संपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनीं पदार्पण केले.
महाराज यांचा एकुलता एक तरूण मुलगा चैतन्य त्यांचा अकस्मात विकाराने मृत्यू झाला.
🙏 सातारकरांची वारकरी परंपरा
श्रीक्षेत्र पंढरपूर वारी
पंढरपूरची वारी महाराष्टाचे एक आगळे वेगळे नवल विशेष आहे. विश्वाला आनंद,आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुध्द एकादशीला संपन्न होते. आषाढी वारीला सर्व संताच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकासह आपआपल्या गावापासून पायी वाटचाल करीत टाळवीणामृंदगाचे नादब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात.
🙏 वारीचे वैशिष्ट्य-
श्री बाबा महाराजांनी परंपरेची ही आळंदी ते पंढरपूर वारी मध्ये चैतन्यधाम श्री क्षेत्र दुधिवरे ते आळंदी पालखी ही भर घालून अधिक आनंददायी वारी केली.
१. माऊलीच्या पालखीबरोबर असणा-या दिंडीत सर्वात मोठा फड. सर्व प्रांतीय, सर्व जातीय,समानतेच्या शुध्द भावनेने ऊक्ती आणि कृतीचे ऐक्य असलेले वारकरी समाविष्ट. सुशिक्षित आणि युवा वारकरी संख्येचे आधिक्य.
२. संप्रदायाचे भजनानंदासह आरोग्य सांभाळीत,खेळ खेळीत प्रवचन कीर्तनाच्या आणि महाराजांच्या समवेत सर्वसोयीयुक्त सुखमय पंढरीची आनंदवारी.
३. दिनक्रमानुसार काकडा, भुपाळी, नित्यपाठाचे, पंचपदीचे भजन, विविध रागदारीतील नामधुन, हरिपाठ, आरती इत्यादी सर्व ऊपक्रम
४. दरवर्षी पालखी सोहळ्याबरोवर १००० वारकरी भक्तांची विनामुल्य सोय.
५. फलटण मुक्कामी प्रतिवर्षी वारकरी माऊली भक्तांच्या डोळ्यांची तज्ञ डाँक्टरांकरवी मोफत तपासणी, चष्मेवाटप.
६. सासवड, वाल्हे, भंडी शेगाव, वाखरी मुक्कामी प्रवचन, लोणंद, पंढरी मुक्कामी कीर्तन लक्षावधी वारकरी आणि इतर नागरिकांची श्रवणार्थ विक्रमी गर्दी.
🙏 नामस्मरण
महाराजांच्या वेगवेगळ्या रागदारीतील ‘रामकृष्णाहरी, हरी विठोबारुक्माई, राम श्रीराम जय जय राम आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ’ भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.
हा बीजमंत्र महाराजांच्या मधुर आवाजात सर्व कार्यक्रमात लावलेला पाहण्यास, ऐकण्यास मिळतो.
🙏 कीर्तन
नाचु कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगीं ।।
या नामदेवरायाच्या वचनामनुसार महाराष्टाच्या खेडोपाडीं, सर्व तालुक्याच्या ठायीं, आणि सर्वच जिल्हाजिल्हात कीर्तनाचा प्रसार केला आहे.
त्यांचे कीर्तन फक्त महाराष्ट्र पुरतेच नव्हे तर, त्यांनी भारताच्या अनेक राज्यतही प्रसार केला. आंध्र, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, ऊत्तर प्रदेश या सारख्या भारताच्या अन्य राज्यातही प्रसार केला.
सातारकर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत कीर्तन केले आहे.
त्यांनी भारत देश बरोबर, प्रदेशातही इंग्लड, अमेरिका मध्ये केलेले कीर्तन तेथील लोकांना खूप आवडले.
हरिनामसप्ताह आयोजन
महाराष्ट्राचे प्रमुख देवस्थान श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र काशी या ठिकाणी त्यांनी हरिनामसप्ताहाचे आयोजन केले. तसेच आळंदी, त्रिबंकेश्वर, नेवासा, सासवड, देहु, भंडारा, पैठण, तेरढोकी, मंगळवेढा या ठिकाणी हरिनामसप्ताहाचे आयोजन केले.
त्यांचे मूळ गाव सातारा या ठिकाणी हरिनामसप्ताह आयोजन करुन तपपूर्तिचा आनंदोत्सव केला.
हरिभजने धवळले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ।।
सेवितो हा रस वाटितो अनेका । घ्या रे होवू नका रानभरी ।।
🙏 समाजकार्य – व्यसनमुक्त समाज
महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशाच्या, आवाहनाच्या सादेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ आपल्या गळ्यात धारण करत आहेत.
कारण त्या माळेच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास गुरुकृपेने मन दृढ राहते.परिणाम संपूर्ण कुटूंबच सात्विक जीवन जगु लागते.
तुलसीमाला धारण करताना नंतर पाळावयाचे नियम महाराज लिखीत स्वरुपात देतात,ते असेः-
तुळशीची माळ घालुन गुरुमुखाद्वारे ‘ जय जय रामकृष्णहरी ’ मंत्र घेणे हाच गुरु अनुग्रह होय.
घातलेली तुळशीमाळ कधीही काढू नये.
माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर परंपरेशी निगडीत झालो ही खूणगाठ बांधावी. त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना हजर राहावे आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी श्री क्षेत्र दुधिवरे येथे २६ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी जो सप्ताह होतो त्या सप्ताहास उपस्थित राहावे.
🙏 समाजकार्य – अन्नदान
चैतन्यधाम मध्ये रोजच चालू असलेले अन्नदान या सर्व प्रकारे समाजाच्या हिताची सदैव जपणूक करत भक्तिप्रेमाने महराजांची जीवनाची वाटचाल आज पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे.
🙏 श्री बाबामहाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार :-
१. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार,
२. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार,
३. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.
४. पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.
🙏 श्री बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट
१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३
२. श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९०
या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री बाबामहाराज सातारकर आहेत.
असे हे भगवंताचे लाडके असे बाबामहाराजांना पांडुरंगाने त्याच्या निजधामास बोलावून घेतले…



भावपूर्ण श्रद्धांजली ! … बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे 26.ऑक्टोबर.2023 ला निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर 27 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार झाले, बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात आले होते यावेळी अनेकांनी मोठी गर्दी केली होती..
त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. ‘पंढरीनाथ महाराज की जय, माऊली..माऊली.. अशा जयघोषात बाबा महाराजांना निरोप देण्यात आला. नातू चिन्मय महाराज सातारकरांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. नेरूळमधील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत बाबा महाराजांना अखेरचा निरोप देण्यात आला.

भावपूर्ण श्रद्धांजली !

28.10.2023
