” तू आणि तूच “
फक्त तू आणि तूच आहेस….
उनाड वाऱ्यात तू, शीतल छायेत तू,
पावसाच्या तुषारांत तू, त्यांच्या स्पर्शात तू,
नदीच्या खळखळण्यात तू, प्रवाहाच्या संगीतात तू,
गुलाबी थंडी तू, श्रावण सरही तूच,
फुललेलं चांदणं तू, मनमोहक चंद्रही तूच,
कोकिळेचा आवाज तू, गंगेची पवित्रताही तूच,
पहाटेचे सुवर्ण किरणं तू, संध्ये ची सुवर्ण कांतीही तूच,
प्रत्यक्षात असलीस तरीही कल्पनेतही तूच आहेस,
नेत्रांत असलीस तरी सर्व इंद्रियांत चैतन्य तूच आहेस,
दिवस आणि रात्र तू असलीस तरीही सृष्टीत साऱ्या तूच आहेस,
सर्वांत सामान्य भासलीस तरी असामान्यांच्या आदर्शातही तूच आहेस,
मोगऱ्याच्या गंधात, रातराणीच्या बहरण्यात तू,
अत्तराच्या कुपीत तू, हृदयाच्या तिजोरीतही तू,
चंदनाच्या सुगंधात, केवड्याच्या दरवळण्यात तू,
प्राजक्त फुलांच्या वर्षावात, चाफ्याच्या अबोल शब्दांत तू,
गुलाबाच्या सौंदर्यात तू….
ग्रीष्मात तू आणि वसंतातही तूच आहेस,
नटलेल्या सृष्टीत तू आणि ब्रह्मांडातही तूच आहेस,
प्रकृतीच्या सौंदर्यात तू आणि रूपातही तूच आहेस,
प्राकृत्याच्या काव्यात तू आणि त्यातील सुरातही तूच आहेस,
विश्वास तू तरीही श्रद्धेत सुद्धा तूच आहेस,
चांदणी रात्र तू तरीही इंद्रधनुतही तूच आहेस,
डोळ्यांतील निरागसता तू तरी दिव्यही तूच आहेस,
कोवळी सुवर्ण कांती तू तरी प्रलयातही तूच आहेस,
मागण्यात जरी तू प्रार्थनेतली तूच आहेस,
दूर देशी जातेस तू परी हृदयातली तूच आहेस,
जन्मांतारीच्या बंधनात तू परी इच्छेतली तूच आहेस,
निर्णयात विधात्याच्या जरी तू प्राणातलीही तूच आहेस,
हर्ष आणि दुःखात तू तरी विचारात तूच आहेस,
जवळ असलीस तरी आनंदाश्रु मध्ये तूच आहेस,
संघर्षात तू तरी जीवनातील प्रत्येक सुखात तूच आहेस,
क्षणभर दुरावलीस तरी ओलावलेल्या पापण्यांत तूच आहेस,
प्रेम रंगात, सजवलेल्या स्वप्नांत तूच आहेस,
स्वप्नातल्या भेटित, भेटीतल्या मैफिलीत तूच आहेस,
प्रेमाच्या अनुभवात, अनुभवातील भावनेत तूच आहेस,
जीवनाच्या प्रवासात, प्रवासातल्या आनंदात तूच आहेस,
होतेस सहचरिणी तू अन् श्वासातही तूच आहेस,
या देहात तू अन् देहातील प्राणातही तूच आहेस,
वेडावणाऱ्या मनात तू अन् मृगजळही तूच आहेस,
युगानुयुगांच्या बंधनात तू अन् मोकळ्या श्वासातही तूच आहेस,
प्रारंभात तू आसमंत-आनंतातही तूच आहेस,
आत्म्यात तू, धमन्यांत-रक्तातही तूच आहेस,
अंतिम क्षणात तू अंत-आरंभातही तूच आहेस,
विचारात तू निर्णयात-निर्मितीतही तूच आहेस,
इच्छेत तू, आशेतिल, विश्वासातही तूच आहेस,
स्पर्शात तू, श्वासातील गंध, स्पंदनातही तूच आहेस,
हृदयात तू, त्यातील धडधडण्यात सुद्धा तूच आहेस,
कसे सांगू माझ्यासाठी माझे सर्वस्वही फक्त तू आणि तूच आहेस…
27 . 12 . 14
