तिच्या साठी …..त्याच्या साठी ….
समर्पणातच असे तिचे जीवनगीत गाणे,
सगळ्यांचेच तिच्याकडे हक्काचे मागणे,
नदी – सागराचे नाते हे निराळे,
भेटण्यास त्यांचे सृष्टीत रूप वेगळे,
त्याच्या साठी ती चे जन्मतःच धावणे,
तिला भेटण्यासाठी त्याचे गगनात सामावणे,
सागरही करतो जीवाची लाही लाही,
पाहून तिला पुन्हा तो आनंदाश्रू वाही,
तळपत्या उन्हात आकाशी वाफ होई,
पाहण्या तिला तो उंच आकाशी जाई,
भेटण्यासाठी तिला तो कधी तांडव करी,
कडकडाट विजांनी साथ देई सृष्टी सारी,
दिसतसे त्याचा तो अथांग राजेशाही थाठ,
तरी तिच्या साठी तो तुडवतसे वादळवाट,
भेटून तिला पुन्हा तिच्या समवेत वाही,
न उरे त्यांच्या आनंदाला पारावार काही,
प्रवासात सोबतीने आनंद गीत गातात,
पाहून मिलन ते सजीव अन् सृष्टिही बहरतात ,
समवेत त्याच्या नदी गात, खळाळतच वाही,
तिच्या साठी तो ही करतो जीवाची लाही लाही.
