” घरपण “
घराचं घरपण हे त्या घरातील महिलांमुळे आहेत…ज्यांच जग हे त्यांच्या घरापासून चालू होत आणि घरातच संपत…
पुरुष हा बाहेरील कर्म व्यवस्थेचा एक भाग आहे, आज महिला सुद्धा बरोबरीने काम करत आहेत, पण त्यांचं घर, घरातील व्यक्ती, सुख, शांती हे प्राथमिक लक्ष आहे…. शील, संस्कार हे स्वतः बरोबरच कुटुंबात, मुलांमध्ये रुजवण्याच काम महिला करतात…
घरात त्यांचं आस्तित्व जाणवत नसेलही बऱ्याच वेळा पण त्या आहेत म्हणून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या मनात येणाऱ्या भावना आणि विचारांची देवाण घेवाण करताना दिसत आहे…
स्त्री ही घरातील सुखा च प्रतीक असते, तिच्यात वसतात नवदुर्गा, वेळेनुसार त्या तिच्यात प्रकट होतात आणि त्या त्या वेळी तुमच्या घराला संकटातून त्या तारून नेतात, समाजात तुमच्या घराची ओळख, पुढील पिढी घडवण्याच्या कार्यात आई, पत्नी रुपी स्त्री चा मोलाचा वाटा असतो.
ज्या घरातील स्त्री सुखी, त्या घरात खऱ्या अर्थाने प्रगती आणि सुख – समृद्धी दिसून येते.
मूलतः स्त्री ही पुरुष प्रधान संस्कृती मध्ये ऐकून घेते म्हणून तिला च ऐकवणे, तिला च जबाबदार समजणे हे खूप सोपं , सहज आहे आणि त्यात ती चा प्रतिकार सुद्धा नगण्यच असतो ..
आणि बहुतेक म्हणूनच ती ला पुढे करण्याचा हा पायंडा पडला असावा… पण स्त्री ची शालीनता हीच तिची खरी शक्ती आहे आणि हीच शक्ती पुरुषाच्या पाठीशी आहे म्हणून तो प्रगतिशील आहे.
ही जाणीव घरातील प्रत्येक व्यक्ती ने ठेवणं हीच त्या घरा साठी सुखाची नांदी ठरते…
पण घरातील आजी आजोबा असो अथवा इतर सदस्य, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नव्हे तर त्या कुटुंबाचा एक भाग समजून त्याला , पुढील पिढीला शक्य तेवढा आकार देण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यांसाठीच सुखकर होईल यात शंका नाही…
ती’ च्या तील शक्तिरुप कुटुंबातील प्रत्येक संकटात धैर्याने उभ राहत, सरस्वती रूप कुटुंबात संस्कार निर्मिती करून, सत्व, शील, शालीनता रुपी ओळख निर्माण करत.
ती’ च्या मध्ये असलेली चंडी अन्याय विरुद्ध आवाज उठवून विद्रोह करून जागृत होते, शैलपुत्री रूप संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते तर कुष्मांडा रूप कुटुंबात माधुर्य टिकवून ठेवते,
प्रत्येक आघाडीवर ही नवदुर्गा अविरत कार्यरत असते.
ज्या कुटुंबात ही जाणीव आणि तिच्या कार्याप्रती कृतज्ञता, आदर ठेवला जातो तिथे सुख आणि समृद्धी यात उत्तरोत्तर वाढ होत असते…
” ‘ती’ च्या आस्तित्व ला लागेल तुमचा हातभार, तर कुटुंबात होईल अभिमानास्पद साक्षात्कार… “
अप्रत्यक्षरीत्या मनावरील ताण, किंवा दिवसभर केलेल्या कामाचा थकवा उतरवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे घर…
पण हे घर घर तेव्हा होत, जेव्हा त्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून एकमेकांवर प्रेम करतात आणि विचारांची देवाण घेवाण करतात…
आज प्रत्येकाला स्वप्नातील घरकुल हवं असतं पण गरज आहे ती स्वप्नातील घरपण निर्माण करण्यासाठी समर्पित होण्याची.
