आत्महत्ती
(वेदना, विचार आणि माणसाचं मन)
काही वर्षांपूर्वी मी एका वृत्तपत्रात “आत्महत्ती” नावाचा लेख प्रकाशित करण्यासाठी दिला होता. कदाचित संपादकाला तो पूर्णपणे पटला नसावा. कारण लेखाचा अक्षरशः सापळा करून तो छापण्यात आला होता. तो वाचताना मला स्वतःलाच वाटलं होतं — “ह्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी!” अर्थात ही चेष्टा होती; पण काही लोक चेष्टा आणि वास्तव यामधला फरक समजून घेत नाहीत.
पण खरं सांगायचं तर आत्महत्या करावीशी वाटणं ही काही फार दुर्मिळ गोष्ट नाही. आयुष्यात कधी ना कधी अनेकांना असे क्षण येतात की जिथे कोणताच मार्ग दिसत नाही. मन पूर्णपणे थकलेलं असतं. जगण्याचा अर्थ हरवलेला वाटतो. खरंतर त्या क्षणीही अनेक मार्ग अस्तित्वात असतात; पण मनावर इतका अंधार पसरलेला असतो की काहीच सुचत नाही. आणि कधी कधी माणूस इतक्या टोकावर पोहोचलेला असतो की त्याला अचानक एखादा “यू-टर्न” दिसला तरी मागे फिरणं शक्य होत नाही.
मी स्वतः कधी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे कदाचित मला त्या वेदनेची संपूर्ण खोली समजत नसेल. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण अनुभवाशिवायही समजू शकतो. माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की तो नदीपुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचला होता. माझं तसं होत नाही. मी फार तर पाणीपुरीच्या गाडीपर्यंत जाते. बहुतेक ती तिखट-आंबट चव माझं डिप्रेशन पचवून टाकते किंवा काही काळासाठी विसरायला लावते.
“आत्महत्ती” हे शीर्षक देण्यामागे एक वेगळीच भावना होती. मला पूर्वी वाटायचं की “हत्ती” — म्हणजे मानवाव्यतिरिक्त इतर प्राणी — आत्महत्या करत नाहीत. मग माणूस का करतो? पण नंतर केरळमधील त्या हत्तिणीची बातमी वाचली. तिच्या सोंडेत फटाक्याचा स्फोट झाला आणि ती जाऊन नदीत उभी राहिली. तिथेच तिचा मृत्यू झाला. तो आत्महत्या होता का? की असह्य वेदनेसमोरची शांत शरणागती? कोण जाणे.
एकदा मी एका कबुतराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण शेवटपर्यंत मला समजलं नाही की त्याला नेमका त्रास काय होत होता. प्राणी आत्महत्या करतात की नाहीत, हे अजून विज्ञानाने ठाम सिद्ध केलेलं नाही. काही प्रजाती मात्र आपल्या समूहाच्या रक्षणासाठी स्वतःचा नाश करतात. काही लोक म्हणतात की झाडांनाही भावना असतात. आफ्रिकेत झाडांना शिव्या दिल्या तर ती कोमेजतात असे प्रयोग झाल्याचं वाचलं होतं. खरं-खोटं माहीत नाही; पण प्रत्येक सजीवावर नकारात्मकतेचा परिणाम होतो, हे मात्र नक्की.
मला आता असं वाटतं की ज्याला भावना आहेत, तो तुटू शकतो. आणि जो विचार करू शकतो, तो आत्महत्येचा विचारही करू शकतो.
मानवाकडे इतर प्राण्यांपेक्षा अधिक आकलनशक्ती आहे. पण त्याचं दुर्दैव म्हणजे त्याला ती कशी वापरायची हे समजत नाही. कधी मतिमंद व्यक्तीच्या आत्महत्येची बातमी ऐकली आहे का? फार क्वचित. कारण विचार जितके गुंतागुंतीचे, तितका माणूस स्वतःच्या मनात अडकत जातो.
पूर्वी आत्महत्यांचं प्रमाण कमी होतं. पण जसजशी स्पर्धा वाढली, उपभोगवाद वाढला, गरजा वाढल्या, माणुसकीपेक्षा पैशाचं महत्त्व वाढलं, तसतसा माणूस अधिक एकटा होत गेला. जीवशास्त्र सांगतं की एखाद्या प्रजातीची संख्या वाढत गेली की एका टप्प्यावर साधनसंपत्तीची कमतरता निर्माण होते आणि मग नैसर्गिकरित्या त्या प्रजातीची संख्या कमी होऊ लागते. पण आत्महत्या ही समाजाच्या भल्यासाठी केलेली कृती नसते. ती बहुतेक वेळा “मी”भोवती फिरणारी असते — माझं आयुष्य, माझं प्रेम, माझी प्रतिष्ठा, माझं अपयश.
‘इज्जतदाराकारण बेइज्जत मरणाहूनी मरण’,(प्रतिष्ठित माणसासाठी अप्रतिष्ठा होऊन जगण्यापेक्षा मरण बरे.) असं “ह्या” प्रतिष्ठित समाजात मानलं जातं. एका बाजूला आपल्याला मॉडर्न व्हायचं आहे (कदाचित फक्त आपल्या कपड्यांनी)
हा “मी”च माणसाला संपवतो.
जगण्याची निवड : ( आत्महत्येपलीकडचे मार्ग )
आत्महत्या बरोबर की चूक हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. पण . आत्महत्या कधी समाजाच्या कल्याणासाठी केलेली नसते. तसे असेल तर त्याला ‘हुतात्मा’ होणे म्हणतात, म्हणजे एखाद्या उदात्त कार्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी किंवा एखाद्या विचारासाठी प्राणार्पण करणारी व्यक्ती.
मला ती पूर्णपणे चुकीची वाटते. कारण जीवन हे रणांगण आहे. प्रत्येक जण रोज काही ना काही लढत असतो. आणि अशा युद्धातून पळून जाणं म्हणजे स्वतःलाच हरवणं.
भारतीय कायद्यात पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न हा दंडनीय अपराध मानला जात होता. मानसिक स्वास्थ्य देखरेख अधिनियम २०१७ नंतर त्यात बदल झाले. आता अशा कृतींकडे मानसिक अस्वास्थ्य म्हणून पाहिलं जातं. आणि ते योग्यच आहे. कारण आत्महत्या ही गुन्हेगारीपेक्षा अधिक मानसिक वेदनेची बाब आहे.
मानसिक स्वास्थ्य हे विचारांवर उभं असतं. “विचार बदला, जीवन बदलेल” असं म्हणतात. आपण जन्माला येताना विचार करून आलो होतो का? मग मरताना इतका विचार कशासाठी?
आपल्याला वाटतं आपल्या जीवनावर सर्वात जास्त अधिकार आपलाच आहे. पण आपण आज जिथे आहोत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी, शिक्षकांनी किती त्याग केलेले असतात! त्यांचा विचार न करता आपण इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकतो?
आणि खरंच, कोणतं कारण इतकं मोठं असतं की त्यासाठी जीव द्यावा? परीक्षा नापास होणं? प्रेमभंग? पैसा नसणं? लोकांची टीका? कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कुठेतरी असतंच. फक्त ते शोधण्याची किंवा निर्माण करण्याची तयारी हवी.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आज चिंताजनक प्रमाणात वाढत आहेत. “परीक्षेत नापास झालो” म्हणून जीव देणं म्हणजे जीवनाचं मूल्य फक्त गुणांमध्ये मोजणं. परीक्षा म्हणजे फक्त एखाद्या विषयाचं प्रमाणपत्र. ते नाही मिळालं तर पुन्हा प्रयत्न करता येतो. शाखा बदलता येते. आयुष्य बदलता येतं. किंवा मग आपल्याला हव्या असणाऱ्या शाखेत प्रवेश मिळाला नाही म्हणून…!!
आपण परीक्षेत कधीच नापास होत नसतो, प्रयत्नात नापास होतो. नाही मिळालं जे हवं होतं ते किंवा ज्याची तुमच्याकडून तुमच्या पालकांना आपेक्षा होती. त्यासाठी जीव देणे सोडून बरेच मार्ग आहेत. एक तर पुन्हा प्रयत्न करा, पालकांशी बोला, शिक्षकांशी बोला, मित्रमैत्रिणींशी बोला, एखाद्या नवीन विषयात पुन्हा सुरुवात करा, काही काळासाठी ब्रेक घ्या किंवा शेवट सांगेन, निर्लज्ज व्हा .. असे बरेच मार्ग असतील.. पण स्वतः ला शून्य समजू नका. स्वतःची दुसऱ्यांसोबत तुलना करणे टाळा.
अब्दुल कलामांना पायलट व्हायचं होतं. त्यांना प्रवेश मिळाला नाही. जर त्यांनी त्याच क्षणी हार मानली असती, तर भारताला राष्ट्रपती मिळाले असते का?
मला अजूनही न पटणारं कारण म्हणजे प्रेमभंगामुळे आत्महत्या करणं. प्रेम ही मुक्त करणारी गोष्ट असावी, कैद करणारी नाही. जर एखादी व्यक्ती आपल्याला नाकारते, तर त्यासाठी स्वतःचा जीव घेणं म्हणजे स्वतःलाच शिक्षा देणं. आपण स्वतःला आवडत नाही, तर दुसऱ्याने आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा का ठेवायची?
म्हणून स्वतःचा द्वेष करून जर मी आत्महत्या करत असेल, तर ज्यावेळी मुळात मीच मला आवडत नाही त्यावेळी प्रियकराला, मी आवडावे, ही आपेक्षा करणे, हा त्याच्यावर अन्याय नाही का होणार?? आपलं स्वतः वर खूप प्रेम पाहिजे. आणि ते असतं ही, त्यामुळेच तर सहन होत नाही की कोणीतरी आपल्याला नापसंत करत आहे. जर लोकांना आपण आवडावे, असं वाटतं असेल तर पाहिले स्वतः पासून नको का सुरुवात करायला..?
मला माहिती आहे लहान वयात ह्या गोष्टी कळण्याच्या स्थितीमध्ये आपण नसतो. पण मुलांना तेवढे मानसिकरित्या सक्षम बनवले पाहिजे. शिक्षकांनी, पालकांनी किंवा अगदी समाज म्हणून आपण त्यांच्या पौगंडावस्थेतील संवेदनशील मनाची अवस्था ऐकून घेतली पाहिजे. ते ही खूप संयमाने.
सर्वात आधी स्वतःवर प्रेम करणं शिकायला हवं.
रॅगिंग, कौटुंबिक संवादाचा अभाव, समाजाची भीती — ही सुद्धा आत्महत्येची मोठी कारणं आहेत. अनेकदा मुलं घरात बोलत नाहीत. पालकांशी मैत्री नसते. मित्र असतात, पण विश्वास नसतो. आणि मग मनातलं मनातच साचत जातं.
जगभरात पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. कारण समाज पुरुषांकडून सतत “मजबूत” राहण्याची अपेक्षा करतो. पण प्रत्येक माणूस एका टप्प्यावर थकतोच.
कर्ज आहे? अपमान होतो? एक वेळचं जेवण मिळत नाही? तरीही आत्महत्या करू नका. गरज पडली तर घर सोडा, गाव सोडा, नव्याने सुरुवात करा. पण जिवंत राहा. कारण मृत्यू प्रश्न संपवत नाही; तो फक्त प्रश्न मागे ठेवून जातो.
विजय माल्ल्या, निरव मोदी जाऊ शकतात ना पळून मग तुम्ही का नाही… याचा अर्थ असा नाही की घेतलेलं कर्ज बुडवाव. ती वेळ मारून न्यावी एवढंच. ‘ कर्ज फेडणे ‘ हे जीवनाचं ध्येय बनवा त्यासाठी जमेल ते प्रयत्न करा, ते फेडून मगच मरायचे. मेल्यावर पैश्यांचे कर्ज फिटत असेल कदाचित पण मनावरचे कर्ज फिटत नाही. म्हणून आत्महत्या ही सुटका नाही.
समाज, आशा आणि जीवनाची शक्यता
ध्येय नसलेलं जीवन निरर्थक वाटतं. म्हणून प्रत्येकाकडे एखादं ध्येय असायला हवं — ते कितीही छोटं असो. दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःचं मूल्य मोजणं बंद केलं की जगणं हलकं होतं.
लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यावर आपलं सुख अवलंबून असू नये.. म्हणून समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत आपण नेहमीच एक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व असू असे नाही. म्हणून नेहमी स्वतः स्वतःची सोबत देणे गरजेचे आहे.
‘मला ह्याजगात कोणी ओळखत नाही. माझं असं कोणी नाही. मी इतरांसाठी इतकं काही करतो. पण नंतर माझ्यासाठी कोणी येत नाही’, मुळात असा विचार करणेच चूक आहे. कोणताही जीव हा स्वभावतः स्वार्थीच असतो. तरीही आपण मानवप्राणी आहोत आपल्यात माणुसकी असावी ही एक साधारण आपेक्षा आहे. पण अजूनही सर्व समाज “मानव” झाला नाही, हे सत्य स्वीकारायला हवे.
समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावर आपण आपले आयुष्य ठरवावे का? आपलं सुख दुसऱ्यावर निर्भर असावं का? ‘आपलं आयुष्य आपल्याला जर सुखात जगायचं आहे ‘, हा आपला विचार जर ठाम आहे तर मग एक दिवस तरी, आपण दुसऱ्या व्यक्तीच्या मतांनी दुःखी का व्हायचे ??
आपला समाज विचित्र आहे. एखाद्याने आत्महत्या केली तरी लोकांना त्याच्या दुःखापेक्षा त्याच्या आयुष्याची चर्चा करण्यात अधिक रस असतो. मृत्यू नंतरही लोक निर्णय देत राहतात….म्हणून समाजासाठी मरायचं नाही. समाज बदलण्यासाठी जगायचं आणि ज्या समाजाचा विचार करून आपण जीव सोडत आहे, तोच मुळात आपल्याला किंमत देत नसेल, तर त्या समाजाचा काय म्हणून विचार करायचा आणि आपलं बहुमूल्य जीवन संपवायचं
असे विचार आले की तुलना करायची ती प्लास्टिक पिशवी सोबत. प्लास्टिक पिशवी सुद्धा नंतर उपयोगाला येईल म्हणून जपून ठेवणारे आपण (किमान मराठी माणूस) आपला जीव का नंतरसाठी जपून ठेवत नाही? (सतत आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्यांसाठी सल्ला; आपल्या जवळ एक प्लास्टिक पिशवी कायम बाळगणे.)
इतक्या लगेच कसं काय ठरवू शकता की आपला ह्या जगात काहीच उपयोग नाही. किंवा आता मला काही करण्यात रसच नाही..?? हीच तर जीवनाची मजा आहे, उद्या कसे पारडे फिरविले जाईल आणि काय होईल याचा काहीच नेम नाही. कदाचित खूप चांगलं असं काही तरी होऊ शकतं. असा कोणताच ज्योतिष नाही की तुमच्या सोबत उद्या काय होईल हे ठामपणे सांगेल. उद्याच्या आशेवर तर जगत राहायचं असतं. आपल्याला ते ठरवण्याचा अधिकारच नाही, की उद्या सुध्दा माझ्यासोबत वाईटच होईल आणि म्हणून मी जीव देणार.
कधी कधी मला स्वतःचाही खूप कंटाळा येतो. तेव्हा मी स्वतःला म्हणते — “जा, आता पूर्ण भारत झाडून काढ.” मग माझा मूड बदलतो. कारण स्वतःच्या विचारांत अडकून पडण्यापेक्षा बाहेरच्या जगाकडे पाहिलं की मन हलकं होतं.
एखादी गोष्ट आपण स्वच्छ केली की नकळत ती गोष्ट आपल्याला आवडू लागते. त्याविषयी आपुलकी निर्माण होते. मग ते आपलं शरीर का असेना.. समजा एखादा दिवस नाही चांगला. काही विचित्र विचारांनी ग्रस्त केलं आहे सकाळपासून. तेंव्हा लगेच अंघोळीला जायचं. अगदी अभ्यंग स्नान करायचं. पुन्हा दिवस सुरू करायचा. सूर्य फिरून यायची वाट नाही बघत बसायचं.
आपल्या समोरची समस्या सोडवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सगळे प्रयत्न करायचे. आणि सगळे मार्ग संपले आता असं जेंव्हा होईल तेव्हा निघून जायचं.. त्या जागेवरून त्या वेळेसाठी निघून जायचं.. कारण मरण एक क्षण असतो. कोणी तो टाळू शकत नाही. पण स्वतःहुन मरणापासून कायम दूर राहायचं.
घर साफ करणं, अंघोळ करणं, कुणाला मदत करणं, चालायला जाणं — या छोट्या गोष्टी माणसाला परत जीवनाशी जोडतात.
आणि जर खरंच मरायचंच असेल, तर आधी काही चांगलं करून का मरू नये?
जो मरण्याचा विचार करतो आहे, त्याला कसली लाज? कसला समाज? कसली परीक्षा? कसला अपमान? मग उठावं, झाडू घ्यावा आणि जग स्वच्छ करायला लागावं. कदाचित जग स्वच्छ करताना आपलं मनही स्वच्छ होईल.
समस्या सुटत नाहीत म्हणून आपण संपून जायचं नसतं. त्या क्षणातून बाहेर पडायचं असतं. जागा बदलायची, वेळ बदलायची, विचार बदलायचे.
मरण हा एक क्षण असतो. पण जीवन ही सतत चालणारी शक्यता असते.
जबाबदारी वाढली की आपण स्वतःच स्वतःकडून जास्त अपेक्षा करू लागतो . एका वेळेस तुम्ही सर्वांना सर्व काही देऊ शकत नाही. जीवनात पैसा नसेल तर गोष्टी अवघड होतात. पण आपण मेलो की आपोआप प्रश्न सुटतील का? आपल्या मुलांना दुसरे आई वडील मिळतील का?
ह्या जगात असंख्य प्रजाती आहेत. काहींचा तर अजून शोधच लागला नाही. त्यांना कोणीही ओळखत नाही आणि त्यांना त्याचा काही फरकही पडत नाही. “असं जगायला काय आम्ही किडे मुंग्या नाही”, असं काही जणांचं मत असेल. पण इतर लोकांच्या नजरेतून स्वतःला मापून, कमी लेखून, आत्महत्या करणे हे किड्या – मुंगी पेक्षा खालच्या दर्ज्याचं नाही का?
आज समाजात आत्महत्या वाढत आहेत. याचा अर्थ आपण कुठेतरी माणूस म्हणून कमी पडतो आहोत. आपलं एखादं वाक्य कुणाला जगवू शकतं, किंवा संपवूही शकतं.
एक समाज म्हणून आपण खूप स्वार्थी जीवन जगत आहोत. आपले विचार सतत स्वतः भोवती फिरत असतात. कुणाला समाजाचे प्रश्न, देशाचे प्रश्न हे माझे प्रश्न वाटत नाहीत. इतकंच काय आपल्या मित्र-मैत्रिणींच्या समस्या सुद्धा आपल्याला फार काही त्रास देत नाहीत. अगदी मला सुद्धा. हो, मी स्वार्थी आहे.
इतकी लोकसंख्या असूनही माणूस एकटा का वाटतो? कारण लोक बोलतात पण ऐकत नाहीत म्हणून किमान आपण तरी असे बनूया की आपल्या आसपासच्यांना एकटं वाटणार नाही. स्वतःत जेव्हा कंटाळाल तेव्हा इतरांचा विचार करा. अश्यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात किंचितसा बदल जरी जाणवला तरी त्याच्या वय्यक्तिक आयुष्यात स्वतः हुन हस्तक्षेप करणे गरजेचे असते.( भले वाद होऊ देत.) मॉडर्न होण्याच्या नादात आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला तर गमवत नाही ना? हे सुध्दा लक्षात घ्यायला हवं. पण आपला हस्तक्षेप, हेच त्या व्यक्तीच्या वैतागण्याचे कारण नसावे, हे आधी तपासून घ्यावे.
जेव्हा समाजात आत्महत्या वाढू लागतात. तेव्हा प्रत्येकाने समाजाचा एक भाग म्हणून स्वतःच निरीक्षण करायला हवे, असे मला वाटते. आपलं एखादं वाक्य सुध्दा कुणाचा तरी जीव घेऊ शकत किंवा वाचवू सुद्धा शकतं.
एवढी प्रचंड लोकसंख्या असून देखील आपल्यापैकी कित्येकांना एकटं वाटतं, आश्चर्य नाही का..? त्यामुळेच तर सोशलमीडियाची आजकाल चलती आहे . लोकांना बोलायचे आहे पण विश्वास ठेवायचा कुणावर? आणि कसा? विश्वास कुणावर ठेवायचा हे तर मी सांगू शकत नाही. पण तुम्ही स्वतः असे बनावे की किमान तुमच्या आसपासचे लोक स्वतः ला एकटे समजणार नाहीत. आत्महत्ती बनणार नाहीत..
काही दिवसांपूर्वी मला चालू पंखा लागला होता. थोडं रक्त आलं. खूप वेदना झाल्या. तेव्हा अचानक विचार आला — एका छोट्या जखमेने इतका त्रास होतो, तर संपूर्ण जीव शरीरातून जाताना किती वेदना होत असतील?
कदाचित हे फक्त “आत्महत्ती”लाच माहीत असेल
एवढं वाचूनही जर कुणाला आत्महत्या करावीशी वाटत असेल, तर कृपया कुणाशी तरी बोला. मित्राशी, शिक्षकांशी, कुटुंबाशी… किंवा अगदी अनोळखी व्यक्तीशी.
कारण अनेकदा उत्तरं आपल्या समस्यांपेक्षा लोकांमध्ये लपलेली असतात.
एवढं वाचून जरी “आत्महत्ती ” होण्याची इच्छा शिल्लक राहिली असेल तर मला मेसेजबॉक्स मध्ये तुमच्या समस्या सांगा. कदाचित तुमच्या समस्यांची उत्तरं अनेकांकडे असतील..
– Swati P.
